नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एस. सोमनाथ यांच्या मते ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे एलियन्सचे अस्तित्व निश्चितपणे आहे. ब्रह्मांडामध्ये एलियन्सच्या वसाहती अस्तित्वात आहेत. एलियन्सचे अस्तित्वाबाबतचे आपले म्हणणे पटवण्यासाठी इस्रोच्या प्रमुखांनी तंत्रज्ञानामध्ये आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबतचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, १०० वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान आज खूप जुने वाटते. सोमनाथ यांनी परग्रहवासीयांबाबत एक डबल एलियन सिव्हिलायझेशन नावाची थियरी सांगितली.
सोमनाथ यांनी सांगितले की, अशा संस्कृतीबाबत विचार करा, ज्यामधील एक आपल्यापेक्षा २०० वर्षांनी मागे आहे. तर दुसरी आपल्यापेक्षा १००० वर्षांनी पुढे आहे. ही शक्यता विकासाच्या टप्प्यामधील व्यापक परिघ दर्शवते, ज्यामध्ये एलियन जीवन असू शकते. आता आपण पुढील सहस्रकामधील तांत्रिक विकासाच्या संदर्भात मानवाच्या स्थितीबाबतही विचार केला पाहिजे, असे आवाहन सोमनाथ यांनी केले.
इस्रोप्रमुखांनी केलेल्या दाव्यानुसार अशा काही एलियनच्या काही संस्कृती असू शकतात, ज्या मानवापेक्षा १ हजार वर्षांनी पुढे आहेत. तसेच ब्रह्मांडामध्ये आधीपासून अस्तित्वात असू शकतात. कदाचित ते मानवासोबत त्यांच्या पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र त्यांचे संकेत आपल्याला अद्याप समजू शकत नसतील.
ब्रह्मांडामध्ये जीवनाचं रूप मानवाच्या तुलनेत अधिक विकसित असू शकतं. त्यामुळे इस्रो प्रमुख सोमनाथ यांना पृथ्वीबाहेर ब्रह्मांडात जीवनाचं अस्तित्व हे वास्तविक वाटते. ब्रह्मांडाचा विचार केल्यास येथे मानव खूप नवा आहे. तसेच जीवन आणि अधिक विकसित संस्कृती ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलेल्या असू शकतात, असे सोमनाथ यांना वाटते.