मुंबई : वृत्तसंस्था
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वाल्मीक कराड हे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. वाल्मीक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते. यामुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.