मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजपासून ती अंमलात आली आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी आणि रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात माहिती दिली.
एसटीची भाडेवाढ १४.९७ टक्क्यांनी झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ३ रुपयांनी झाली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत, त्यामुळं प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्यानं एकत्रितपणे १४.९७ टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल तर या गोष्टीची भविष्यात गरज असणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत, मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. एसटीकडे १४,३०० स्वत:च्या बसेस आहेत. त्यावर ८७ हजार कर्मचारी काम करत आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती.
इलेक्ट्रिकच्या ५ हजार बसेसची ऑर्डर दिलेली आहे. साडे चारशे ते पाचशे बसेस एसटीच्या ताफ्यात आल्या आहेत. एसटीचे उत्पन्न फार कमी आहे. २०२५ पर्यंत त्या बसेस मिळणे अपेक्षित होते, पण चारशे ते पाचशे बसेस आलेल्या आहेत. बॅटरी आणि चार्जिंग स्टेशनचा प्रश्न आहे. भविष्यात पूर्णत: इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रयत्न असेल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.