22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीयऐतिहासिक सत्तांतर!

ऐतिहासिक सत्तांतर!

ब्रिटनमध्ये मागच्या १४ वर्षांपासून सत्तेत असणा-या हुजूर पक्षाचा १९० वर्षांमधला सर्वांत दारुण पराभव करत ब्रिटनच्या जनतेने ऐतिहासिक सत्तांतर घडविले आहे. किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वात मजूर पक्षाने ६५० जागांपैकी ४१२ जागांवर विजय मिळवत ब्रिटनची एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. जनाधार पुरता कमी होण्याच्या आधी निवडणूक घेण्याची पंतप्रधान ऋषी सुनक यांची खेळी फारशी लाभदायक ठरली नाहीच. हुजूर पक्षातला भ्रष्टाचार, पक्षांतर्गत लाथाळ्या, नेत्यांचा उथळपणा, उर्मटपणा, पक्षांतर्गत राजकारणातून होत असलेले सततचे नेतृत्वबदल, नेतृत्वाची अकार्यक्षमता, बे्रग्झिट धोरणाबाबतचा गोंधळ, आर्थिक पातळीवरचा भोंगळ कारभार, त्यामुळे अडचणीत सापडलेली देशाची अर्थव्यवस्था, त्यातून वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, करांचा अतिरिक्त बोजा अशा अनेक कारणांनी पुरत्या वैतागलेल्या ब्रिटिश मतदारांनी हुजूर पक्षाला मतपेटीतून जोरदार धडा शिकवला. हुजूर पक्षाला या निवडणुकीत अवघ्या १२१ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना तब्बल २५१ जागांचा फटका सहन करावा लागला. मजूर पक्षाने २७ वर्षांनंतर प्रथमच ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता काबिज करण्याचा विक्रम केला. मात्र, ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत जास्त म्हणजे ४१८ जागा जिंकण्याचा टोनी ब्लेअर यांचा विक्रम मजूर पक्षाला मोडता आला नाही. १९९७ मध्ये टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वात हुजूर पक्षाने ४१८ जागांवर विजय मिळविण्याचा विक्रम केला होता.

हा विक्रम मोडण्यात मजूर पक्ष थोडा कमी पडला असला तरी या पक्षाने ‘चारसौ पार’चा विक्रम आपल्या नावे केला आहे. अर्थात प्रचारात तसा कुठला दावा न करताही त्यांनी हा विक्रम नोंदविला असल्याने तो विशेष कौतुकास्पद ठरतो! ब्रिटनच्या नागरिकांनी परिवर्तनाला कौल देत हुजूर पक्षाच्या भोंगळ कारभारावरचा आपला असंतोष व्यक्त केला आहे, असाच या ऐतिहासिक सत्तांतराचा अर्थ आहे. सुनक यांच्या पक्षाच्या पराभवाने भारतीयांची मने हळहळली कारण सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. शिवाय भारताचे जावई आहेत. मात्र, हुजूर पक्षाचे बुडते जहाज त्यांना वाचविता आले नाही कारण काहीही केले तरी हे बुडते जहाज वाचविणे अशक्यच होते. त्यामुळेच ब्रिटनमधील १८ लाख भारतीय मतदारांनी हुजूर पक्षाला समर्थन दिले नाही. मात्र, याच निवडणुकीत ब्रिटनच्या संसदेत प्रथम २६ भारतीय वंशाचे खासदार निवडून आले आहेत. मागच्या वेळी ही संख्या १५ होती. त्यात लेस्टर मतदारसंघातील हुजूर पक्षाच्या शिवानी राज यांचा विजय लक्षवेधी ठरला.

मागच्या ३७ वर्षांपासून मजूर पक्षाच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ त्यांनी हिसकावून घेतला. याच मतदारसंघात २०२२ मध्ये भारत व पाक समर्थकांमध्ये दंगल झाली होती. मजूर पक्षाच्या जोडीनेच लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षानेही ७१ जागांवर विजय मिळवत शानदार कामगिरी केली आहे. मागच्यावेळी या पक्षाकडे अवघे ८ खासदार होते. त्यांनी यावेळी ६३ अतिरिक्त जागांवर विजय मिळवला आहे. युरोप, फ्रान्स, अमेरिका येथे मागच्या काही निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे जोरदार वारे वाहताना पहायला मिळत होते. मात्र, ब्रिटनच्या मतदारांनी डाव्या विचारसरणीस जवळ करणा-या मजूर पक्षाला भरभरून पसंती दिली, हे ही या निवडणूक निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना स्टार्मर यांनी ब्रिटनमध्ये आशेचा सूर्यकिरण चमकत असून परिवर्तनाला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. ते आता हा ऐतिहासिक विजय कसा पेलतात आणि मतदारांच्या आशा-अपेक्षांची पूर्तता कशी करतात याची ब्रिटिश नागरिकांसह संपूर्ण युरोपला प्रतीक्षा असेल.

स्टार्मर यांच्याकडे करिष्मा नसल्याची टीका होत होती. मात्र, त्यांनी ऐतिहासिक विजयाचा करिष्मा करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे. पेशाने वकील असणा-या स्टार्मर यांनी हुजूर पक्षाच्या राजवटीत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा झालेला खेळखंडोबा अत्यंत आक्रमकपणे अधोरेखित करून तो मतदारांच्या मनात पुरता उतरवला. हुजूर पक्षातील नेतृत्वबदलाकडे लक्ष वेधून त्यांनी पक्षांतर्गत लाथाळ्यांकडे व त्यामुळे देशाच्या होत असलेल्या नुकसानाकडे मतदारांचे लक्ष वेधले. ब्रिटनच्या राजकारणात मजूर पक्षाला केंद्रस्थानी आणण्याची किमया स्टार्मर यांनी करून दाखविली. आता त्यांच्यावर ब्रिटनमध्ये बदल घडवून आणण्याची व सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची मोठी जबाबदारी असेल. त्यांना अर्थव्यवस्थेला गती देण्यापासून देशातील निर्वासितांचे प्रश्न सोडविण्यापर्यंतचे अनेक संवेदनशील विषय आता हाताळावे लागणार आहेत व मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे.

सुनक यांनाही याच समस्यांसह पंतप्रधानपद स्वीकारावे लागले होते. या आव्हानांचा सामना करण्याचा त्यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्नही केला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामागे त्यांना त्यांच्याच पक्षातून पुरेसे समर्थन नसणे हे प्रमुख कारण होते. त्यांच्या अगोदरच्या पक्षनेतृत्वाने केलेल्या भोंगळ कारभाराचा फटका सुनक यांना सोसावा लागला. आजवर ब्रिटनच्या राजकीय क्षेत्रात हुजूर व मजूर या दोन प्रमुख पक्षांचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, आता इतर पक्षांनीही आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली आहेत, हे या निवडणूक निकालातून स्पष्ट होते आहे. लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाने मिळविलेले या निवडणुकीतील यश हे त्याचे ठळक उदाहरण! या ऐतिहासिक सत्तांतराचा भारत-ब्रिटन संबंधावर काय परिणाम होणार, असा प्रश्न भारतीयांच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे व याची स्टार्मर यांनाही पुरती जाणीव असावी त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षाची पूर्वीची ‘भारतविरोधी’ ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचारात जाणीवपूर्वक केलेला दिसतो.

त्याचे ठळक उदाहरण म्हणजे मजूर पक्षाने २०१९ मध्ये काश्मीरमध्ये पर्यवेक्षक पाठविण्याचा जो प्रस्ताव मंजूर केला होता तो स्टार्मर यांनी रद्द केला असून काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठीची सुनक यांनी लावलेली व्हिसाबंदी उठवण्याचे आश्वासन स्टार्मर यांनी दिले आहे. भारतासोबत लवकरच मुक्त व्यापार करार करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच भारतीय आयटी व मेडिको व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये विशेष दर्जा देण्याची घोषणाही स्टार्मर यांनी अगोदरच केली आहे. त्यामुळे स्टार्मर यांना भारतासोबतच्या चांगल्या संबंधाचे राजकीय व आर्थिक तसेच जागतिक महत्त्व नक्कीच उमजलेले असल्याचे मान्य करायला हरकत नाही. त्यामुळे मजूर पक्षाच्या कार्यकाळातही भारत-ब्रिटन संबंध वृद्धिंगत होतील, ही आशा करण्यास काहीच हरकत नाही, हे निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR