लातूर : प्रतिनिधी
ओलगे…ओलगे… सालम पोलगे… चा गजर आज जिल्ह्यातील शेतशिवारांनी घूमणार आहे. आज दि. ३० डिसेंबर रोजी दर्श वेळा अमावस्या उत्साहात साजरी होणार आहे. खरे तर हा कृषी संस्कृतिचा उत्सव आहे. काळ्या आईची मनोभावे पुजा करुन वनभोजनाचा अस्वाद घेतला जातो. त्यानिमित्ताने गेली आठ दिवस सर्वत्र दर्श वेळा अमावस्येची जोरदार तयारी सुरु होती. रविवारी भाजी मंडईत भाजी खरेदीची एकच गर्दी होती.
लातूर, धाराशीव व कर्नाटक राज्याच्या सीमा भागात दर्श वेळा अमास्येचा उत्सव साजरा केला जातो. दर्श वेळा अमावस्येला सकाळी सर्व कुटूंब शेतशिवारात जाते. मित्र, स्नेही, नातेवाईकांना वनभोजनासाठी खास करुन बोलावण्यात येते. शेतातील झाडाखाली कडब्याची कोपी केली जाते. त्यात पांडवांची आरास मांडून त्याची पुजा केली जाते. पुजेनंतर वनभोजनाचा आस्वाद घेतला जातो. वेळा अमावस्येच्या पूर्वसंध्येपासूनच शहरातून गावाकडे जाण्यासाठी लगबग होती. काही कुटुंबांनी शहरातून वनभोजनाचा मेनू तयार करुन शेत गाठण्याच्या तयारीत होते.
रविवारी दिवसभर दर्श वेळा अमास्येची घाईघाई सुरु होती. दर्श वेळा अमावस्येला आपल्या भागातील बोली भाषेत ‘येळवस’, असेही म्हणातात. येळवसच्या तयारीत सारेच गुंतले होते. शनिवार, रविवार आणि सोमवारी येळवस अशी सलग सुट्या आल्याने शनिवारपासूुनच गावाकडे जाणा-यांची लगबग सुरु होती. रविवारीही शहरातील मध्यवती बसस्थानक, क्रमांक दोनचे बसस्थानक, ग्रामीण बसस्थानकावर नागरिकांची गर्दी होती. येळवसच्या खास मेनूसाठी लागणा-या भाज्या खेरदीची एकच गर्दी दिसून आली.