पारा ६ अंश सेल्सिअस
लक्ष्मण पाटील
निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात दि. १६ डिसेंबर रोजी किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. त्यामुळे औरादसह परिसर थंडीने गारठला आहे. गारठा वाढल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार वस्त्र परिधान करीत शेकोट्या पेटविल्या जात आहेत. यावर्षी पहिल्यांदाच पारा ६ अंश सेल्सिअस इतका कमी झाल्याची नोंद येथील हवामान केंद्रात झाली आहे, अशी माहिती हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी दिली. यासोबतच मराठवाड्यातील परभणीतही तापमान नीचांकी असून, सोमवारी येथील तापमानही ४.१ अंश सेल्सिअस नोंदल गेले. राज्यातही सर्वत्र तापमान घटले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे शहर तेरणा व मांजरा नदीच्या मुशीत वाढले आहे. यामुळे या शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ््यात उष्णता व हिवाळ््यात कडाक्याची थंडी सहन करावी लागते. गत ४ दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने अंगात हुडहुडी भरली जात आहे.
यात दि. १३ डिसेंबर रोजी किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल ३० अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले होते. त्यानंतर प्रतिदिन तापमानात घट होत गेली. त्यानुसार दि १४ डिसेंबर रोजी किमान १० अंश सेल्सिअस तर कमाल २९.५ अंश सेल्सिअस, दि. १५ डिसेंबर रोजी कमाल २९ अंश सेल्सिअस व किमान ८ अंश सेल्सिअस तर १६ डिसेंबर रोजी तापमानाचा पारा कमी होत ६ अंश सेल्सियस तर कमाल ३० अंश सेल्सिअस नोंदला गेला. ही यंदाच्या हिवाळ््यातील नीचांकी नोंद ठरली आहे. त्यामुळे औराद शहाजानी परिसर थंडीने गारठला आहे.
अशा स्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार वस्त्र परिधान करीत आहेत. तसेच शेकोट्या पेटविल्या जात आहेत. औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर आज दि. १६ डिसेंबर रोजी यंदा प्रथमच सर्वांत कमी ६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे, असे हवामान मापक मुक्रम नाईकवाडे यांनी एकमतशी बोलताना सांगितले.