26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरऔसा तालुक्यात जिल्हाधिका-यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ

औसा तालुक्यात जिल्हाधिका-यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ

औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील  लामजना, येथील शेतकरी  केशव शिवहार पाटील यांच्या शेतात बीज प्रक्रिया करून टोकन यंत्राने सोयाबीन पिकाच्या २.८० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी  वर्षा ठाकूर घुगे  यांच्या हस्ते गुरुवार दि १३ जून रोजी करण्यात आला. या शेतक-यांने महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून खत मिश्रीत बेड पावसापूर्वीच तयार करून ठेवले होते. मान्सूनचा पाऊस झाल्याबरोबर पेरणीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिका-यांनी शेतक-याकडून राबविलेल्या बाबी व तंत्रज्ञानांची माहिती घेतली. मोठ्या प्रमाणावर टोकन यंत्राने सोयाबीन पेरणी करीत असल्यामुळे सदर शेतक-याचे कौतुक केले. यानंतर  तांबरवाडी येथील शेतकरी  खंडू सोमवंशी यांच्या शेतामध्ये बीज प्रक्रिया करून बेडवर टोकण यंत्राने व ठिबक सिंचनाचा अवलंब करून ६.४० हेक्टर क्षेत्रावर सलग तुर लागवडीच्या पेरणीचा शुभारंभही त्यांनी केला. तद्नंतर  खरोसा येथील  बब्रुवान डोके यांच्या क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धतीने (बी बी एफ तंत्रज्ञान ) सोयाबीन पेरणीचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
याच ठिकाणी एक लाभार्थी एक वृक्ष मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. खरोसा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. गतवर्षी येथे २०० हेक्टर क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धतीने तर ५० हेक्टर क्षेत्रावर टोकन यंत्राने पेरणी करण्यात आली होती. यावर्षी मौजे खरोसा येथे ५०० हेक्टर क्षेत्रावर रुंद वरंबा सरी पद्धतीने तर १०० हेक्टर क्षेत्रावर टोकन यंत्राने सोयाबीन पेरणी करून घेण्याचे उद्दीष्ट कृषि विभागाने ठेवलेले आहे. याकरिता कृषि विभागाच्या मदतीने खरोसा गावामध्ये शेतक-यांचा एक युवा गट पुढाकार घेतो आणि बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी करण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त केले जाते. गतवर्षी येथील शेतकरी श्री राहुल डोके यांना हेक्टरी ४३किं्वटलचे विक्रमी सोयाबीन उत्पादन घेण्यात यश आले आहे.
     जिल्हाधिकारी यांनी खरोसा येथेच बैलगाडीमध्ये बसून  मारुती शेषेराव राऊतराव यांच्या शेताला जाऊन बैलचलित तिफणीने सोयाबीन पेरणीचा शुभारंभही केला. लामजना,तांबरवाडी व खरोसा येथील या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर आला  टी जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी  दिलीप जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी  सुभाष चोले उपविभागीय अधिकारी औसा-रेणापूर अविनाश कोरडे, तालुका कृषि अधिकारी औसा  संजयकुमार ढाकणे  मंडल कृषि अधिकारी लामजना विकास लटूरे, कृषि पर्यवेक्षक ज्ञानोबा जाधव, प्रताप खांडेकर, सतीश घुले, कृषि सहाय्यक शिवाजी पाटील, सुनील जोगदंड, मुक्ताबाई गंगथडे, गोपीचंद सूर्यवंशी, लामजना मंडळातील सर्व कृषि सहाय्यक आणि तीन्ही गावचे लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.  लामजना, तांबरवाडी आणि खरोसा येथील शेतक-यानी कृषि विभागाबद्दल व्यक्त केलेल्या मतामुळे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे  यांनी कृषि विभागाचे कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR