22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरकचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा टाळा, शहरात स्वच्छता राखा

कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा टाळा, शहरात स्वच्छता राखा

लातूर : प्रतिनिधी
मागच्या तीन-चार दिवसांत झालेला संतधार पाऊस आणि लातूर शहरातील नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी सकाळी लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात जाऊन प्रशासक असलेले आयुक्त व इतर अधिका-यांसमवेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. शहरात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने वेळेत कचरा व्यवस्थापन करावे व नाले साफसफाईतील हलगर्जीपणा टाळावा, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवावेत आदी सूचना आपण दिल्या असल्याचे बैठकीनंतर काँग्रेस भवन येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून झाल्या नाहीत त्यामुळे लातूर महापालिकेत सुमारे अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. प्रशासक म्हणजे शासकीय कारभार त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवरून शुक्रवारी आपण महानगरपालिका कार्यालयात जाऊन आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीस लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त शुभम कयातमवार, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, नगर रचनाकर निकिता भांगे, शहर अभियंता नवनाथ केंद्रे, लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखापरीक्षक तावडे, रमाकांत पिडगे, रुक्मानंद  वडगावे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर शहरातील हत्तेनगर भागात नळाव्दारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन सर्वच ठिकाणी स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अमृत-२  योजनेत मंजूर झालेले मांजरा धरणापासूनच्या शहरापर्यंतच्या पाईप लाईनचे काम त्वरित पूर्ण करावे, शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींचे जतन करून धोकादायक इमारतींबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करावी. पर्यावरण संरक्षणासाठी शहरात सिटी बस, ऑटो रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालवण्याची व्यवस्था होईल का ते पहावे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाच्या विस्तारासंबंधी मागील जिल्हाधिकारी यांनी मांडलेली कल्पना, प्रस्ताव रुपाने शासनाकडे पाठवावी,
 शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहाण्यासाठी आणखी बहुमजली वाहनतळाचे प्रस्ताव तयार करावे, शहरातील युनीपोल उभारणी करताना नियमात तडजोड तर केली नाही याची चौकशी करून शहराचे विद्रुपीकरण थांबवावे. शहरातील भटक्या प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करावा, साई पर्यटन केंद्र येथे श्वानांसाठी उभारलेले लसीकरण केंद्र इतरत्र हालवावे, कचरा डेपोसाठी शहरापासून तसेच शहरानजीकच्या गावापासून म्हणजे मानवी वस्तीपासून दूर कचरा डेपो उभारावेत, भुमीगत गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मोहीम राबवावी, गाव भागातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी भुमीगत गटार योजनेसह नव्याने अराखडा तयार करावा आदी सूचना केल्या असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. शहरात उभारण्यात आलेल्या शादीखान्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या नियमित व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात यावी आदी सूचनाही या बैठकीदरम्यान आपण दिल्या आहेत, असे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान केलेल्या सर्व सूचनांची नोंद आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी घेतली आहे.
या वेळी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त शुभम कयातमवार, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, नगर रचनाकर निकिता भांगे, शहर अभियंता नवनाथ केंद्रे, लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य लेखापरीक्षक तावडे, रमाकांत पिडगे, रुक्मानंद वडगावे सर्व क्षेत्रीय अधिकारी  यांनी  घेतली असून त्यावर गांभीर्यपूर्वक कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती आमदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर जिल्हा  महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, काँग्रेसचे उदगीर विधानसभेचे निरीक्षक रवींद्र काळे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, सचिन बंडापले, व्यंकटेश पुरी, रविशंकर जाधव, रमेश सूर्यवंशी, राम स्वामी, विजयकुमार साबदे, बालाजी साळुंके आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR