सातारा : कण्हेर धरणामधून वेण्णा नदीपात्रामध्ये दुपारी १२ वाजता पाच हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठावरील लोकांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आज दुपारी १२ वाजता धरणाचे वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून ५००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. आवक वाढेल त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
नदीतीरावरील गावातील नागरिकांनी आपल्या पशुधनासह नदी पात्रात जाऊ नये. कण्हेर धरणामधून वेण्णा नदीत पाणी सोडल्यामुळे म्हसवे पूल-करंजेकडून म्हसवेकडे जाणारा पूल हमदाबाज पूल- हमदाबाजकडून किडगावकडे जाणारा पूल हे पूल पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे या पुलांवरून कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.