मैदानी चाचण्याही घेतल्या, छ. संभाजीनगरमध्ये तरुणांची फसवणूक
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचे आमिष दाखवून तिघांनी चक्क बोगस भरतीचे आयोजन केले. पोलिस भरतीप्रमाणे त्यांची मैदानी चाचण्याही घेतल्या. पात्र उमेदवारांना पैशांची मागणी करताच या टोळीचा भांडाफोड झाला आणि त्यांची रवानगी थेट पोलिस ठाण्यात करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा नाट्यमय घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव या घोटाळेबाजांना अटक करण्यात आली. हे सर्व पंढरपूरचे रहिवासी असून सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर १७ डिसेंबरच्या सकाळी या भरतीचे आयोजन केले. भल्या पहाटेच अनेक तरुण हजर झाले. लष्कराप्रमाणे भरतीची प्रक्रिया, पगार निकष सांगण्यात आले. कागदपत्रे गोळा करून सर्वांची मैदानी चाचणी घेतली. यातील ९२ जणांना आरोपींनी संपर्क करून २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पुन्हा त्याच मैदानावर अंतिम प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येकी ६ हजार रुपये घेऊन येण्याची सूचना केली होती. त्यावरून संशय निर्माण झाला.
तिघे भामटे पोलिसांच्या ताब्यात
भरतीबाबत परवानगी व काही कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी आरोपींची बोबडी वळली. तोपर्यंत सर्वांनीच ६ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. संतप्त उमेदवारांनी तिघांना पकडून सिटी चौक पोलिस ठाण्यात हजर केले. निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या आदेशावरून निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.