22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रकराडला सीआयडी कोठडी

कराडला सीआयडी कोठडी

७ दिवस पोलिसांच्या ताब्यात, कराडभोवती फास आवळला!
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर ७ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिका-यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले. खंडणीची मागणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येची इंटरलिंक असल्याचा महत्त्वपूर्ण दावा कोर्टात करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने ७ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.

बीडच्या मोक्का कोर्टात इन कॅमेरा सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीसाठी ९ ते १० ग्राउंडस मांडले तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले. यावेळी खंडणी आणि हत्या प्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणी प्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणा-या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले. त्यामुळे या प्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचे सांगत आरोपीची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार वाल्मिक कराडला ७ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होती, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात म्हटले. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिका-यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिले होते. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला. सदर आरोपी संघटित गुन्हे करण्यात तरबेज असून या संदर्भात सखोल तपास करणे गरजेचे आहे, म्हणून १० दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी एसआयटीने कोर्टात केली होती. मात्र, कोर्टाने ७ दिवसांची कोठडी सुनावली.
…………………………………….
बीड कोर्टाबाहेर राडा
वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी सुनावल्यानंतर त्याला पोलिस व्हॅनमधून जेलच्या दिशेला घेऊन जात असताना कोर्टाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. आंदोलकांकडून कोर्टाबाहेर वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर वाल्मिक कराडचे समर्थकदेखील कोर्टाबाहेर जमले. त्यांच्याकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे कराडची कोर्टात बाजू मांडणारे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हेही आक्रमक झाले. याप्रसंगी कराड समर्थक मोठ्या संख्येने हजर होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
…………………………….
कराडच्या समर्थनार्थ
पांगरीमध्ये आंदोलन
वाल्मिक कराडच्या पांगरी गावात महिलांनी थेट रस्त्यावर उतरत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कराडवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यापूर्वी परळी पोलिस ठाण्याबाहेर कराडच्या आईने ठिय्या आंदोलन केले होते. आज पांगरीत महिला आक्रमक होत थेट रस्त्यावर झोपल्याचे पाहायला मिळाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR