ग्रामस्थ आक्रमक, धनंजय देशमुख यांचे आज टॉवरवर चढून आंदोलन
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत तर मस्साजोगच्या गावक-यांनी मंगळवारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करावे आणि त्यालाही मोक्का लावण्यात यावा, यासाठी धनंजय देशमुख आणि गावक-यांनी हे पाऊल उचलले आहे. थेट ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही. खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केले जात नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला. पण त्याला मोक्का लावण्यात येत नाही, अशी तक्रार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोक्का लावा, या मागणीसाठी गावकरी मंगळवारी सकाळी १० वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.
खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी धनंजय देशमुखांची मागणी आहे. वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी थेट आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून, त्यासंबंधीचा निर्णय आज ग्रामस्थांनी घेतला.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होऊन गेला. तरीही अजून आरोपींना अटक झालेली नाही. तसेच वाल्मिक कराडविरोधात मोक्काही लावला गेला नाही. त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झाले असून, आता त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
धनंजय देशमुख मैदानात
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी मंगळवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी उद्या ग्रामस्थ धनंजय देशमुखसोबत टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत.