मुंबई : प्रतिनिधी
राज्यातल्या शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर बरीच टीका झाली. सगळी सोंगं करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतक-यांनी ३१ मार्चपूर्वी पीककर्जाचे पैसे भरावे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता कर्जमाफीबाबत विचारताच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांना सुनावले. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांना केला. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता असेही कृषिमंत्री म्हणाले.
बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीवरून विधान केले होते. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफीबद्दल ऐकलं का? कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतक-यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असा सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. शेतक-यांच्या भेटीदरम्यान कृषिमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत हे विधान केले.
तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे त्याची. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे आता तुम्हाला. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात. भांडवली गुंतवणूक सरकार देते. शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.