माजी मंत्री अनिल देशमुख यांचा हल्लाबोल
नागपूर : प्रतिनिधी
शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर थेट हल्लाबोल करीत कर्जमाफीचे आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता, असे म्हटले. शेतक-यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधा-यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसत आहे. अजितदादा पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही, असे वक्तव्य केले. यावरून यांची खरी नियत लक्षात येते, असा आरोपही त्यांनी केला.
महायुतीचे सरकार आल्यावर शेतक-यांची कर्जमाफी करू, असा जाहीरनाम्यात भाजपाने स्पष्टपणे उल्लेख केला होता. आता सरकार म्हणून अजितदादा पवार यांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्या बळीराजाला कर्जमुक्त करुन आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली का, असे विधान अजित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानामुळे शेतक-यांमधून आता तीव्र रोष व्यक्त होत आहे.