बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकातील भाजप आमदार मुनीरथना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर छळ, धमकावणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिसाने सांगितले की, मुनीरत्नाविरुद्ध दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
यामुळे आम्ही त्यांना कोलार येथून ताब्यात घेतले असून, त्यांना बंगळुरूला आणले जात आहे. दुसरीकडे भाजपनेही मुनीरथना यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने त्यांना पाच दिवसांत शिस्तपालन समितीसमोर आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मुनीरथना कर्नाटकच्या राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
ब्रहत् बंगळुरू महानगरपालिका (बीबीएमपी) कंत्राटदार चेलुवराजू यांच्या तक्रारीवरून मुनीरथना यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये आमदारावर ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आणि रक्कम न मिळाल्यास करार रद्द करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला धमकावणे, शिवीगाळ करणे आणि त्रास देणे या आरोपाखाली आमदार आणि सरकारी अधिका-यांसह अन्य तीन जणांना आरोपी करण्यात आले आहे.
बीबीएमपी नगरसेवकाने देखील पोलिसांत दिली तक्रार
दरम्यान, भाजप आमदार मुनीरथना यांच्याविरोधात दुसरी तक्रार बीबीएमपी नगरसेवकांनी दिली आहे. नगरसेवकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदाराविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल केला आहे. आमदाराने जातीवाचक शिवीगाळ करून आपल्या कुटुंबाचा अपमान केल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.