23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरकर वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम

कर वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम

लातूर : प्रतिनिधी
शहरातील मालमत्ता धारकांकडे थकीत असणारा कर वसूल करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही कर भरणा केला जात नसल्याने पालिकेने आता जप्ती मोहीम सुरु केली आहे.नागरिकांनी जप्ती टाळण्यासाठी कर भरणा करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कर भरणा करण्यासाठी मनपाच्या वतीने आतापर्यंत मालमत्ता धारकांना सूचना देण्यात आल्या.अनेक नोटीसाही पाठवण्यात आल्या. तरीही कराचा भरणा केला जात नसल्याने पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मंगळवारी कांही मालमत्तांची जप्ती करण्यात आली.क्षेत्रीय कार्यालय अ अंतर्गत बार्शी रस्त्यावरील एव्हरग्रीन नर्सरी या मालमत्ता धारकाकडे एकूण २ लाख ८१ हजार ५३० रुपये कराची थकबाकी होती. तो न भरल्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशावरून नर्सरी सील करण्यात आली.या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख, कर निरीक्षक प्रदीप जोगदंड,वसुली लिपिक विकी खंदारे,अमोल गायकवाड,सुशील ताटे, युनूस पठाण, विलास मगर यांच्यासह कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

‘डी’ झोन मध्येही अशीच कारवाई करण्यात आली. एका मालमत्ताधारकाने २ लाख ९७ हजार ४० रुपयांचा कर थकवाल्यामुळे त्यांच्या मालमत्तेत असणारे बँकेचे एटीएम व दुकान सील करण्यात आले.या कारवाईत झोन डी चे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे,कर निरीक्षक तहेमुद शेख,वसुली लिपिक भालचंद्र कांबळे, दत्त्ता गंगथडे, गोविंद रोंगे, देवेंद्र कांबळे व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. क्षेत्रीय कार्यालय बी मध्ये मालमत्ताधारकाने थकीत ३लाख ३६ हजार ३८२ रुपयांचा धनादेश मनपाच्या अधिका-यांकडे सुपूर्द केला.

मनपाने थकीत कर भरणा करण्यासाठी आतापर्यंत अनेक सवलती,योजना जाहीर केल्या होत्या.तरीदेखील अनेकांनी कराचा भरणा केला नाही.त्यामुळे पालिकेने आता जप्ती मोहीम सुरू केली आहे.ही कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी मनपाकडे आपल्या कराचा भरणा लवकरात लवकर करावा,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR