25.4 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeपरभणीकळगाव स्नेहसंमेलनात हाणामारी, पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी

कळगाव स्नेहसंमेलनात हाणामारी, पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी

ताडकळस : येथुन जवळच असलेल्या कळगाव येथील एका खासगी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दि.२८ जानेवारी रोजी काही तरुणांनी एकमेकांशी भांडण करून तुंबळ हाणामारी केली. यावेळी कर्तव्यावर असलेले ताडकळसचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देखील युवकांकडुन मारहाण करण्यात आली.

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना परभणी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्याचे समजते. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व पोलीसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी १६ जणांसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ६ ते ७ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, ताडकळस येथुन जवळच असलेल्या कळगाव येथील एका खासगी विद्यालयात दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असताना उपस्थित काही तरुणांनी एकमेकांशी वाद घालत मोठ्या प्रमाणात भांडणे करून एकमेकांस मारहाण केली. यावेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले ताडकळसचे पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोलीस हवालदार मारोती कुंडगीर, महिला पोलीस कर्मचारी खिल्लारे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी शासकिय कामात अडथळा निर्माण केला व पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले.

पोलीसांना खतम करून टाकु अशी धमकी देऊन जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक काठेवाडे यांना उपचारासाठी घेऊन जात असताना देखील अटकाव केला. याप्रकरणी पोलीस हवालदार मारोती कुंडगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ जणांसह व अन्य आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रशेन देशमुख यांच्यासह विशेष पोलीस दलातील अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बाबत ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे व पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR