मुंबई : प्रतिनिधी
जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
असे असताना काँग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असून, तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिली आहे.
आंबेडकरांमुळे भाजपला फायदा होईल…
२०१९ मध्येही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाहीत. मात्र, त्यांच्यामुळे भाजपला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळविले आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद म्हणाले आहेत.
दोस्तीचा हात पुढे करायला तयार : नाना पटोले
प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी स्वत: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही आहेत. आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करण्यासाठी तयार आहोत, तुम्हाला पाहिजे असलेल्या जागा पण द्यायला तयार आहोत, असे पटोले म्हणाले आहेत.