23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeसंपादकीय‘काँग्रेसयुक्त भारत’च हवा!

‘काँग्रेसयुक्त भारत’च हवा!

लोकसभेचा महामहोत्सव म्हणून ओळखल्या जाणा-या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) २९४ जागा जिंकून केंद्रात सलग तिस-यांदा सरकार स्थापनेच्या दिशेने कूच केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनेही २३२ जागा जिंकून एनडीएला जोरदार टक्कर देत त्यांच्या नाकीनऊ आणले. अन्य पक्षांना १७ जागा मिळाल्या. गत निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३०३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. मात्र यावेळी भाजपला केवळ २३९ जागा मिळाल्याने त्यांना मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी सुमारे ६४ जागा भाजपने यावेळी गमावल्या आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसने ९९ जागांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजे काँग्रेसचे संख्याबळ ४७ जागांनी वाढले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपची सर्वाधिक भिस्त उत्तर प्रदेशावर होती; परंतु तेथे भाजपला जोरदार चपराक मिळाली. त्या राज्यात समाजवादी पक्षाने भाजपच्या तोंडाला फेस आणला.

त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चपराक दिली. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकून भाजपचे गणित बिघडवले. महाराष्ट्रात भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केले त्याला जनतेने खरपूस उत्तर दिले आहे. गत दोन वर्षांत भाजपने महाराष्ट्रात जे कूटनीतीचे राजकारण केले ते त्यांच्यावरच बूमरँगसारखे उलटल्याचे लोकसभा निकालावरून दिसून आले आहे. नैतिकतेचा टेंभा मिरवणा-या भाजपने राज्यात जे घाणेरडे राजकारण केले त्याला मतदारांनी मतपेटीद्वारे पूर्णत: झिडकारले आहे. ही एक प्रकारे भाजप, मोदी व फडणवीसांना मोठी चपराकच आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर ३७० जागा जिंकणार आणि रालोआ ‘अब की बार चारसौ पार’ जाणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्वच नेते व्यक्त करीत होते. मात्र ‘चारसौ पार’च्या विश्वासाचा फुगा महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालने फोडला. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेच मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर होऊ लागले. त्यात रालोआच्या घोषणेप्रमाणे ४०० पारचा आकडा गाठणार, असे निष्कर्ष जाहीर झाले.

त्यामुळे भाजपसह त्यांचे मित्र पक्ष आणि समर्थक यांना आकाश ठेंगणे झाले. मात्र मंगळवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर होताच रालोआ, मित्र पक्ष आणि समर्थक जमिनीवर आले. यंदाच्या निवडणुकीने ‘मोदी की गॅरंटी’ निष्प्रभ ठरल्याचे दाखवून दिले आहे. अलीकडे भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी म्हणजे भाजप, असे राजकीय समीकरणच बनले होते. मोदी हेच भाजपचे ‘वन मॅन शो’ बनले होते. निवडणूक काळात मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावत सारा भारत पिंजून काढला होता. ‘मोदी है तो मुमकीन है’ हाच विश्वास भाजपच्या नेतेमंडळींना होता. त्यामुळेच ‘अब की बार चारसौ पार’, ‘काँग्रेसमुक्त भारत’चे नारे दिले गेले होते. वास्तविक पाहता गत दहा वर्षांत देशात ‘मोदीराज’ होते. या काळात त्यांना ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सिध्द करण्यास खूप वाव होता. पण मोदी सरकारची गाडी प्र्रारंभापासूनच रुळावरून घसरली. काँग्रेसला चावे घेण्याचे काम मात्र त्यांनी मोठ्या आवडीने केले. देशातील काळा पैसा खणून काढून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा वायदा केवळ ‘जुमलेबाजी’ ठरला.

देशातील भ्रष्टाचार न संपता उलट वाढत गेला. देशातील स्वायत्त संस्थांच्या कारभारात कमालीचा हस्तक्षेप वाढला. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. बहुचर्चित ‘नोटाबंदी’ चा निर्णय साफ चुकला, त्याची मोठी किंमत सामान्य नागरिकांना बँकेच्या रांगेत उभे राहून चुकवावी लागली. ‘एक देश एक कर’ या गोंडस नावाखाली देशात लागू करण्यात आलेल्या जीएसटी करप्रणालीने छोटा व्यापारी वर्ग उद्ध्वस्त झाला. कोरोना काळात देशवासीयांना कधी ‘थाळ्या वाजवा’, कधी ‘मेणबत्त्या पेटवा’ असे आवाहन करून अवैज्ञानिक मुद्यांचे समर्थन करण्यात आले. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन मोदी सरकार विसरले. त्याविरुध्द शेतक-यांची आंदोलने चिरडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. वांशिक दंगलीने मणिपूर पेटले; परंतु पंतप्रधानांनी मणिपूरला भेट दिली नाही. मोदी सरकारच्या कालावधीत जातीपातीतील भांडणे तीव्र झाली, धार्मिक विद्वेष वाढीस लागला. महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारे उलथवून टाकण्यात आणि राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करण्यात मोदी सरकारने विशेष रस दाखविला. मराठी-गुजराती या सुप्त संघर्षाला हवा देण्याचे प्रयत्न झाले. निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग झाला. यंदाच्या निवडणुकीत ‘मोदी मॅजिक’ चालले नाही.

आपल्या प्रचार सभांमधून मोदींनी केवळ विरोधकांवर टीका करण्यातच धन्यता मानली. काँग्रेसला चावे घेण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत मोदींनी एकच काम केले ते म्हणजे काँग्रेसवर आरोप, पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांवर बेलगाम आरोप. जनतेला ते अजिबात आवडले नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा त्यांनी सातत्याने दिला. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर केला. संसदीय प्रथा, परंपरांना तिलांजली दिली. काँग्रेसकडे संघटना, पैसा नव्हता. राहुल गांधींनी जनतेसाठी, लोकशाहीसाठी लढा उभारला. शून्यातून पक्ष पुन्हा उभा केला. द्वेषाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी ‘मुहब्बत की दुकान’, ‘भारत जोडो यात्रा’ काढली. शेतक-यांसह उपेक्षित घटकांना हलाखीचे जीणे जगावे लागत आहे, सरकारला त्याची चिंता नाही, हा राहुल गांधींचा मुद्दा देश पातळीवर प्रभावी ठरला. जनतेने ‘काँग्रेसमुक्त’ नव्हे ‘काँग्रेसयुक्त भारत’ हवा आहे हे आपल्या कौलातून दाखवून दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR