लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक कमी झाली आहे. बाजारात कांद्याची आवक घटली असून शहरात कांद्याचे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात सरासरी ७० ते ८० रुपये प्रतीकिलो दराने कांदा विकला जात आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सरासरी ठोकमध्ये चागल्या प्रतिचा दर मिळाला. परंतु, या भाववाढीचा फायदा गतवर्षाप्रमाणे यंदाही व्यापा-यांनाच होत आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु,
नाशिकच्या मुख्य कांदा बाजारात कांद्याचे भाव वधारल्याने त्याचे पडसाद येथील बाजारातही उमटले आहेत.
मागील तीन-चार दिवसांपासून ठोक बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी सध्या दोनशे किंव्टल कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीत कांद्याला आज किमान तीन हजार पाचशे, तर कमाल चार हजार सहाशे रुपये प्रती किंव्टल दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्ग सुकावला असला तरी सामान्याला महागाईचा फटका बसत आहे. शहरातील बाजारपेठेत जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून व शेजारी राज्यातून कांद्यांची आवक होत असते. बाजारात कर्नाटकातील पांढ-या कांद्याची आवक वाढली आहे.
विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे व पुढील काही दिवस तरी कांद्यांचा दर स्थिर राहतील असे व्यापा-यांनी सांगितले.