नाशिक : प्रतिनिधी
नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासह त्यांच्या २०० ते २५० कार्यकर्त्यांविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांमधील वाद प्रकरणी एक गुन्हा, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी चार गुन्हे, वाहनात पैसे आढळल्याप्रकरणी दोन गुन्हे, तर गाडीत मद्याच्या बाटल्या सापडल्या प्रकरणी एक गुन्हा, असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदगाव नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदगाव मतदारसंघात मतदानाच्या दिवशी बाहेरून लोक आणल्याच्या मुद्यावरून सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात संघर्ष झाला. समीर यांनी आपली वाहनं रस्त्यात आडवी लावून बाहेरून आलेल्या लोकांची वाहनं काहीवेळ रोखून धरल्याने कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी कांदे यांनी भुजबळ यांच्या अंगावर धावून जात ‘तुझा आज मर्डर फिक्स आहे’ अशी धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.