22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरकांद्याला मिळतोय कवडीमोल भाव

कांद्याला मिळतोय कवडीमोल भाव

लातूर : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी १ हजार २५० क्विंटल कांदाची आवक झाली. आवक कमी झाल्याने प्रथम क्रमांकाच्या कांद्यास सर्वाधिक २० रुपये, तर कमीत कमी कांद्यास ४ ते ५ रुपये बाजारभाव मिळाला. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सध्या कांद्याला क्विंटलमागे अल्प भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांवर संक्रांत आली आहे.
कांद्यास बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी सरकारवर नाराज आहेत. कांद्याचे बाजारभाव वाढत नसल्याने शेतक-यांचा उत्पादनाचा खर्च ही वसूल होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे हाल होत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात कांद्याला चांगला भाव मिळतो, पण यंदा परिस्थिती उलट आहे. बाजार समितीत कांदा अल्प दराने खरेदी केला जात आहे. तोच किरकोळ बाजारात चड्या दराने विक्री केली जात आहे. मात्र शेतक-यांकडून खरेदीच्या वेळी अल्प दराने खरेदी केला जात असल्याने शेतक-यांना किलोमागे केवळ ४ ते ५ रुपये मिळू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. याच भावात मंगळवारी कांद्याची बाजार समितीत लिलाव झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बीड, धाराशिव येथून सध्या जवपास १ हजार २५० क्विंटल कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे. मात्र कांदा दर्जेदार नसल्याचे सांगत व्यापा-यांकडून दर पाडण्यात आला आहे. यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.
कांद्याची निर्यात खुली करूनही शेतक-यांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र सध्या पाहयला मिळत आहे. कांदा निर्यातबंदी संपून जवळपास २० ते २५ दिवस उलटले तरी कांद्याच्या घाऊक दरात फारशी वाढ झालेली नाही. केवळ अध्यादेश काढल्याचा एक दिवस सोडला तर मागील काही दिवसांपासून सर्वसाधारण १४ ते १५ रुपये दर कांद्याला मिळत आहे.  आजही बाजारभाव जैसे थे असल्याने पुढील काळात भाव वाढतील का?  असा प्रश्न शेतक-यांच्या मनात निर्माण होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR