पूर्णा : तालुक्यातील गणपुर-ममदापूर शिवारातून जाणा-या रेल्वे पटरी लगतच्या एका शेत आखाड्यावर बांधलेल्या एका लहान वासराचा मंगळवारी रात्री अज्ञात हिस्त्र पशूने फडशा पाडला होता. सुरूवातीस मोकाट कुत्री, तडस, कोल्हा सारख्या हिस्त्र पशुने वासराची शिकार केली असावी असे वाटत होते. परंतू दि.२८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कान्हेगांव शिवारातील नदीपात्रालगत काही रेती तस्करांना बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कान्हेगावांपासून दीड किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदीपात्र लगतच्या शिवारात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही रेती तस्कर नदीपात्रातून रेती उपसा करून ती वाहनात भरून घेऊन जात असताना चक्क त्यांची वाटच बिबट्याने अडवली. टिप्परच्या जोरदार प्रकाशामुळे त्याला समोरचे काही दिसत नसल्याने टिप्पर मधील लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर बिबट्याची वार्ता गावात वा-यासारखी पसरली. ग्रामस्थांनी आपापल्या आखाड्यावरील जनावरे घेऊन गाव जवळ केले. पोलिस पाटील रामभाऊ मोरे यांनी मंदिराच्या लाऊड स्पीकर मधून सर्वांना सुचना दिली आहे.
दरम्यान गणपूर- ममदापूर शिवारातील वासराच्या शिकार प्रकरणी गावातील काही लोकांनी वनविभागास याची कल्पना दिली. ही शिकार वाघ बिबट्या सुदृश्य प्राण्यांनीच केली असावी असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला होता. दरमयान कानेगाव शिवारात बिबटयाचे दर्शन झाल्याने वासराचा फडशा बिबट्यानेच पाडल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी अंगद आयनाळे घटनास्थळाकडे पथकासह तातडीने रवाना झाले. आखाड्यावर नागरिकांनी समुहाने रहावे व न घाबरता पशुधनाची काळजी घ्यावी. एकट्याने सुनसान किंवा नदीपात्रालगत फिरु नये असे आवाहन त्यांनी केले.