नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावे लागेल की, यावेळी संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अधिवेशनात राज्य, देश आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करावी यासाठी आम्ही संसदेत जातो. पण जेव्हा गदारोळ होतो आणि चर्चाच होत नाही, त्यावेळी खूप अस्वस्थ वाटते. एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक आंदोलन करत असतात, जो त्यांचा अधिकारही आहे पण यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारीही आंदोलन करताना दिसले. मते वेगळी असू शकतात, त्यात काही गैर नाही पण एका सशक्त लोकशाहीत संसदेमध्ये चर्चा व्हायलाच हवी.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न पडतो. कल्याणमधील घटनेने पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वाद उफाळला आहे. राज्यात महायुतीला जनतेने मोठा बहुमत दिले आहे मात्र तरी देखील अद्यापही राज्याला गृहमंत्री नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने अॅक्शन घेऊन हे सारे थांबवले पाहिजे अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.