मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील नामांकित हॉस्पिटलने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील कामा या सरकारी हॉस्पिटलने रील्स बघण्यावर बंदी घातली आहे आणि जर या नियमाचे उल्लंघन केले तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. रील्स आणि शॉर्ट व्हीडीओंना लोक पसंत करतात. रील्स बघण्याच्या नादात अनेकदा महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होते.
सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी मुंबईतील नामांकित हॉस्पिटलने त्यांच्या नियमावलीत बदल केला आहे. कामा हॉस्पिटलमध्ये रील्स बघण्यावर आणि मोबाईलच्या अतिवापरावर बंदी घालण्यात आली आहे. रील्स बघण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. शासकीय कार्यालयात काही कर्मचारीही रील्स पाहण्यात व्यस्त असतात. त्याला आळा घालण्यासाठी कामा रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी ऑनड्युटी असताना मोबाईलचा गैरवापर टाळावा. तसेच रील्स बनवू नयेत आणि बघूही नयेत म्हणून कामा रुग्णालयाने असा फतवा काढला आहे.
रुग्णालयात मोबाईलचा वापर हा शासकीय कामासाठीच करावा. तसेच शासकीय कामकाजासाठी संदेश पाठविण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करावा. जेणेकरून ऑडिओ-व्हीडीओ क्लिप, फाइल्स आदी माहितीची सुरक्षित देवाण-घेवाण होईल, असे कामा हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
कर्मचा-यांनी या नियमांचे पालन करायचे आहे. जर हे नियम पाळले गेले नाहीत तर कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जे कर्मचारी कामावर असताना मोबाईलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.