नगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणा-यांचे आता आमदार होणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहते का? अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांची ४० वर्षांतली दहशत मोडून काढणार आहे, असा निर्धार करत भारतीय जनता पक्षाचे नेते सुजय विखे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
आजची सभा ही संगमनेर विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी आहे. चाळीस वर्षांची दहशत मोडून काढणारी आजची सभा आहे. चाळीस वर्षांत तुम्हाला महिलेच्या डोक्यावरचा हंडा काढता येत नसेल तर तुम्हाला विधानसभेचा फॉर्म भरायचा सुद्धा अधिकार नाही.
मला तिकिट नाकारलं हे मीडियात पाहिले, कोणत्या सूत्रांनी ही माहिती दिली? यांची हवा इतकी टाईट झाली का आता हे बातम्या सुद्धा पेरायला लागले. चाळीस वर्षे तुम्ही सेटलमेंटचे राजकारण केले, अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली.
संगमनेरमध्ये माझ्या कार्यकर्त्यांवर जर कोणी दहशत करायचा प्रयत्न केला, जर माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर इथेच येऊनच मी तुम्हाला गाडेल हा सुजय विखेंचा शब्द आहे, असा इशाराही सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.