श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फ्रेंस आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली. भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला शंकराचार्य पर्वताच्या मुद्यावरुन घेरलं आहे. भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसला शंकराचार्य पर्वताचे नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करायचे आहे का? असा प्रश्न विचारला.
नॅशनल कॉन्फ्रेंसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शंकराचार्य पर्वताचे नाव बदलून तख्त-ए-सुलेमान करणार असल्याचे म्हटले आहे. श्रीनगरमध्ये हा पर्वत आहे. या टेकडीवर शंकराचार्य मंदिर आहे. शंकराचार्य मंदिर भगवान शिव शंकरांना समर्पित आहे. काश्मीर खो-यातील हे सर्वात जुनं मंदिर आहे.
शंकराचार्य पर्वताबद्दल एका प्राचीन इतिहासकाराने सांगितले की, या पर्वताला आधी जीतलार्क किंवा जेठा लारक म्हटले जायचे. त्यानंतर या पर्वताचे नाव बदलून गोपादारी पर्वत झालं. ‘राजतरंगिणी’ नावाच्या संस्कृत ग्रंथात कल्हण यांनी लिहिलय की, राजा गोपादित्यने आर्यदेशातून (आर्य भूमी) आलेल्या ब्राह्मणांना पर्वताच्या खाली जमीन दिली. राजा गोपादित्यनी इ.स. पूर्व ३७१च्या आसपास ज्येष्ठेश्वर मंदिराच्या रूपात पर्वतावर मंदिर बनवले होते. त्यामुळेच या पर्वताला आधी जेठा लारक म्हटले जायचे.
जम्मू काश्मीर पर्यटन विकास महामंडळानुसार, शंकराचार्य पर्वतावर बनवलेले हे मंदिर मौर्य राजवंशाच्या सम्राट अशोक यांच्या मुलाने बनवले होते. राजतरंगीणी ग्रंथानुसार, गोनंदिया राजवंशाच्या राजा अशोकचा पुत्र जलोकाने हे मंदिर बनवले होते.