मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते. तर पालघरचा दौरा अर्धवट सोडून चव्हाण दिल्लीत गेल्याची माहिती पुढे आली परंतु आपण दिल्लीला गेलो नसून कृपया प्रसार माध्यमांनी प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात असे स्पष्टीकरण आमदार रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला.
दरम्यान, अजित पवार यांच्याच विमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परत आले. शनिवारची अमावास्या संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असे सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे.
भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते, असेही बोलले जात असताना याबाबत आता स्वत: रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती दिली आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसांत किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती! या आशयाची एक पोस्ट ट्विट करत रवींद्र चव्हाण यांनी याबाबत भाष्य करत स्पष्टोक्ती दिली आहे.
डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० चा आहे.
डोंबिवली विधानसभेतून भाजप या पक्षाकडून २००९, २०१४ आणि २०१९ साली रवींद्र चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. चव्हाण हे वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री होते. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्याचे ते मंत्री होते.