किनगाव : प्रतिनिधी
येथे अनेक वर्षानी व्यापा-यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते अतिक्रमण काढण्याची विनंती करूनही अतिक्रमण काढले नसल्याने पोलीस प्रशासनाने थेट कार्यवाही करीत अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली त्यामुळे अतिक्रमणातून किनगावकरांना सुटकेचा श्वास सोडला आहे. या रस्त्यावरून वहान चालक नागरिक यांना चालणे गैरसोयीचे बनले होते. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाने उपमुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय अहमदपूर यांना दि.२० नोव्हेंबर २०२३ रोजी किनगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढणेबाबत पत्र दिले होते. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अहमदपूर ते अंबेजोगाई रोड, किनगाव ते गंगाखेड रोड, किनगाव ते कारेपूर रोड, या तिन्ही रस्त्यावर व्यापारी नागरिकांनी अतिक्रमण केले आहे आणि रहदारीस अडथळा केला आहे. संबंधीत अतिक्रमणधारकांना अनेक वेळा तोंडी सूचना देऊनही सदरचे अतिक्रमण काढून घेतले नाही. सदरचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी, असे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी पत्र दिले होते.
याबाबत वहानास अडथळा निर्माण होऊ नये व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने कलम १०२,११७ नुसार कार्यवाही करीत थेट अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. यात ग्राम पंचायत कर्मचा-यांनी रोडवरील अतिक्रमणधारकांनी दुकानासमोर लावलेले फलक, पाट्या, सामान काढून टाकले त्यामुळे वाहनधारक,नागरिकांना रस्त्याहून चालण्यासाठी मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे किनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भाऊसाहेब खंदारे, मुरुडकर, श्रीरामे, गोरे, महाके, दहीफळे, आदी पोलीस बांधव व ग्राम पंचायत कर्मचा-याचे ग्रामस्थाकडून अभिनंदन होत आहे.