मुंबई : प्रतिनिधी
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फिश येतात. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फिशची दहशत असते. यंदा पावसाळा उशिरा झाल्याने जेलिफिश आले नव्हते.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून जवळपास मुंबईच्या सर्व बीचेसवर जेली फिश यायला सुरुवात झाली आहे. अजून जेली फिश चावल्याच्या घटना घडल्या नाहीत. आम्ही पालिकेच्या आरोग्य खात्याला कळवल्याची माहिती दृष्टी लाईफ सेव्हिंग कंपनी प्रा. लि. चे निरीक्षक नितेश बाईत यांनी दिली.
तर आज सकाळी जुहू बीचबर ब्ल्यू बॉटल जेली फिश आले असल्याची माहिती जुहू बीचवरील जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी दिली. मुंबईच्या बीचेसच्या किना-यावर जेली फिश आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटीसह अन्य चौपाट्यांवर समुद्रात पाण्यात उतरू नये. ब्ल्यू बॉटल जेली फिशपासून स्वत: ला वाचवावे. तर नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये, समुद्रकिनारी फिरू नये असे आवाहन दृष्टी लाईफ सेव्हिंग कंपनीने पर्यटकांना केले आहे.
गणपती विसर्जनापर्यंत जेली फिशचा समुद्रात वावर असतो. दर शनिवारी, रविवारी सुमारे २५००० पर्यटक जुहू व गिरगाव चौपटीवर येतात. समुद्राचे आकर्षण असते, मात्र पर्यटकांनी सूचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात उतरू नये असे आवाहन त्यांनी केले.
कसे असतात जेली फिश
पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात. समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेली फिश समुद्रकिना-याजवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेली फिश हे विषारी असून साधारणपणे हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे असतात. त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून ते चावल्यावर अस वेदना होतात. पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाने त्यांची ओळख आहे.