लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसापासून भाजीपाल्याची आवक मंदावली असल्याने किरकोळ बाजारात सर्वच भाजीपाल्याचे भाव तेजीत आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागत असल्याने गृहणीचे बजेट कोमलडले आहे.
जिल्ह्यात सर्वोदूर पाऊस झाल्याने गेल्या काही दिवासापासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटत चालली आहे. अचानक होत असलेल्या पावसाने भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. जोरदार पावसाने शेतात पाणी साचून भाजीपाला कूजत असल्याने बाजारात आवक कमी होत आहेत. दरम्यान ज्या उत्पादकांचा टोमॅटो टीकला आहे त्या शेतक-यांच्या मालाला चांगला दर मिळत आहे. पंधरा दिवसापुर्वी टोमॅटोला बाजार समितीत १० ते १५ प्रतिकिलो भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र आता टोमॅटोमधील तेजी परतली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. टोमॅटोप्रमाणेच शिमला, फुल गोभी, दोडका, काकडी, लिंबू, लसून सह सर्वच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. बाजार समितीत टोमॅटोचे दर प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना किरकोळ बाजारात अधिक दराने टोमॅटो खरेदी करावा लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सर्वच भाज्यांची दरवाढ सुरू असताना बाजार समितीत टोमॅटोचे दर मात्र प्रचंड कमी झाले होते.
परंतु, आता आवक घटल्याने टोमॅटोच्याही दरात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या दरवाढीमुळे शेतक-यांना दिलासा मिळत असला, तरी सामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. शहरातील किरकोळ बाजारात वागें ३० ते ५० रूपये प्रतिकिलो, भोपळा ३० ते ३५ रूपये प्रतिकिलो, काकडी ६० ते ७० रूपये प्रतिकिलो, ल्ािंबू ७० ते ८० रूपये प्रतिकिलो, अदरक १२० ते १४० रूपये प्रतिकिलो, दोडका ६० ते ७० रूपये प्रतिकिलो, आवळा ४० ते ५० रूपये प्रतिकिलो, गावराण टोमॅटो १२०० ते १५०० रूपये कॅरेट, वैशाली टोमॅटो ९०० ते १२०० रूपये कॅरेट, शिमला मिरची ५० ते ६० रूपये प्रतिकिलो, गवार ६०ते ७० रूपये प्रतिकिलो, कोथिंबीर २५ ते ३५ रूपये प्रतिकिलो, फुल गोबी ६० ते ७० रूपये प्रतिकिलो, पत्ता गोबी २० ते ३० रूपये प्रतिकिलो, बटाटे ३२ ते ३५ रूपये प्रतिकिलो, कांदा ४५ ते ५५ रूपये प्रतिकिलो, बिट ३० ते ४० रूपये प्रतिकिलो, भेंडी २० ते ४० रूपये प्रतिकिलो, लसून ३३० ते ४०० रूपये प्रतिकिलो, कांदा पात १२ ते १५ रूपये पेंडी, मेथी २० ते २५ रूपये पेंडी, चुका ३० ते ३५ रूपये पेंडी, मुळा १० ते १५ रूपये प्रतिकिलो, शेवगा ८० ते ९० रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री केली जात आहे.