नवी दिल्ली : किर्गिजस्तानात सध्या भारत आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थ्यांकडून हल्ले केले जात आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ४ पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणानिमित्त या देशात महाराष्ट्रातील मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
किर्गिजस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या हिंसाचाराचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक विद्यार्थी किर्गिजस्तानमध्ये अडकले आहेत, पण ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या महाराष्ट्रातून किर्गिजस्तानमध्ये वास्तव्यास आहेत.
यामध्ये संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत, त्यातच हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्याने स्थानिक प्रशासनाने भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, परीक्षेनंतर जुनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
किर्गिजस्तानमधील पाकिस्तानी युवक आणि स्थानिक युवकांमध्ये वाद झाल्याने हिंसाचार भडकल्याचे सांगितले जात आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, यामध्ये आत्तापर्यंत ४ पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे.