पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. स
द्गुरू डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता साधकाश्रम आळंदी येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय कीर्तन संमेलन हिवरा (ता. मेहकर)चे ते अध्यक्ष होते. सार्थ श्री ज्ञानेश्वरी, विचार सागर, वृत्तिप्रभाकर रहस्य, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र, श्री ज्ञानेश्वर महाराजांची वेदनिष्ठा, सोहम, योग, योगत्रयी, प्रवचनमाला १ ते २७ अशा १०५ ग्रंथांचे संपादन तथा लेखन त्यांनी केले आहे.
पुणे विद्यापीठ व नागपूर विद्यापीठाचे संतवाङ्मयातील पीएच.डी.चे परीक्षक म्हणून त्यांना काम केले आहे. ते श्रीक्षेत्र देहू-आळंदी विकास परिसर समितीचे अध्यक्ष होते. तसेच, त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
थोर विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला : अजित पवार
संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सद्गुरू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने समाजाला योग्य दिशा दाखवणारा थोर विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.