मुंबई : प्रतिनिधी
माझ्या माहितीप्रमाणे महाकुंभमेळ्यातील मृत्यूचा आकडा १००हून जास्त आहे. अनेकजण बेपत्ता आहेत. कुंभमेळ्याचे राजकीय मार्केटिंग सुरू आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला भाजपा आणि योगी सरकार जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थितीवरदेखील मत व्यक्त केले.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभमेळ्यात ३०हून भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून योगी सरकार आणि भाजपावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपासह उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.
भाजपाचे सीए किरीट सोमय्या-
खासदार राऊत म्हणाले, ‘कुंभमेळ्यासाठी दहा हजार कोटींचे बजेट होते. पण, एक हजार कोटी रुपयेदेखील खर्च झाले नाहीत. भाजपाचे सीए किरीट सोमय्या यांनी तिथे जायला पाहिजे. ९ हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? ते पैसे कोणाच्या खात्यावर गेले, याचा ईडीला अहवाल द्यायला हवा. कशाप्रकारे अव्यवस्था होती? कशाप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले? हे भाविकांनी माध्यमांना सांगितले. ज्यांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कोणावर करावा, याचे उत्तर द्यावे. कुंभमेळ्यात भाजपाचे नेते आणि मंत्र्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती.
शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल
चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजपाचे युतीचे समर्थक राहिले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा दावा करताना आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. अमित शहा यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. कारण, त्यांचे आर्थिक हितसंबंध हे मुंबईत गुंतलेले होते. शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल, असा दावा खासदार राऊत यांनी केला.