सोलापूर -सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर म हाराजांच्या यात्रेच्या धार्मिक विधीना सुरुवात झाल्यानंतर कुंभार समाजाकडून यात्राप्रमुख हिरेहब्बू यांना ५६ मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला. हिरेहब्बू वाड्यालगत असणाऱ्या कुंभारवाड्यातून हा सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, कुंभार समाजाच्या कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर महाराज यांच्याशी होतं असतो. याच पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी लागणारे ५६ मातीचे घागरी यात्राप्रमुख हिरेहब्बू यांना मोठ्या उत्सहात सुपूर्द करण्यात आल्या.
तत्पूर्वी कुंभार वाड्यात या मातीच्या घागरिंची तसेच श्री गणेशाची मंगलवाद्याच्या ध्वनीत यथोचित पूजा मानकरी योगेश म्हेत्रे कुंभार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. कुंभारवाड्यात मोठ्या स्वरूपात हा सोहळा संपन्न झाला. सकाळी श्री गणेशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर मातीचे घागरीचे पूजन संपन्न झाले. सदरच्या घागरी तैलाभिषेक धार्मिक विधीसाठी वापरल्या जातात. त्याचा मान कुंभार समाजाकडे असल्याचे मानकरी योगेश म्हेत्रे कुंभार यांनी सांगितले.
या धार्मिक कार्यक्रमानंतर यात्रेच्या धार्मिक विधींची सुरुवात झाली असून मोठ्या भक्तीमय वातावरणात मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला. वाड्यातील पूजा संपन्न झाल्यानंतर कुंभार समाजातील सुहासिनी महिलांनी सदरच्या मातीच्या घागरी आपल्या डोक्यावर घेऊन हिरेहब्बू यांच्या वाडयाची वाट धरली. दरम्यान या धार्मिक विधी बाबत कुंभार समाजातील ज्येष्ठ माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे कुंभार तसेच मानकरी महादेव म्हेत्रे कुंभार यांनी अधिक माहिती देताना, कुंभार समाजातील सर्व लहान थोर समाज बांधवांनी कुंभार वाड्यातून एकत्र येत सदरच्या मातीच्या घागरी मंगल वाद्याच्या गजरात यात्राप्रमुख हिरेहब्बू यांना सुपूर्द करतात.