17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरकृषि महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ थेट शेतक-यांच्या बांधावर 

कृषि महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ थेट शेतक-यांच्या बांधावर 

लातूर : प्रतिनिधी
जो अहोरात्र जगाचे पोट भरण्यासाठी राबतो, मेहनत करतो त्या बळीराजासोबत हितगुज करून त्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर तालुक्यातील बोरवटी व महापूर येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, देशी गोवंश पालनातून पशुपालकांनी आत्मनिर्भर व्हावे. राज्यमाता गोमाता संवर्धन शेतकरी व पशुपालकांसाठी वरदान होय. पशुंसाठी मुक्तसंचार गोठा पद्धत ही फायदेशीर असून त्यांचे वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे. सध्या हवामान बदलामुळे चारा व पाणीटंचाईची समस्या जाणवत असून, कमी तापमानामुळे दुध उत्पादनात २० ते २५ टक्के घट होवून त्याचा दुधाच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होतो म्हणून पशुपालकांनी हवामान बदलानुसार पीकपद्धतीचा व पशु संगोपनाचा अवलंब करावा असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. विजय भामरे म्हणाले की, तुर व हरबरा पिकावरील  महत्वाच्या किडी उदा. शेंगा पोखरणारी आळी, पिसारी माशी, घाटे आळी इत्यादीबद्दल माहिती व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय सांगून त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. अच्युत भरोसे  यांनी जैव तंत्रज्ञान काळाची  गरज या विषयाबाबत मार्गदर्शन केले.  या चर्चासत्र कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर यांनी केले. प्रक्षेत्र भेटीस विशाल भांदर्गे, विष्णू माने, भरत नरवाडे, संजय रणखांब,  शालुबाई रणखांब, विजयकुमार रणखांब, सर्जेराव शिंदे, सिधराम चव्हाण, भरतराम जाधव असे बोरवटी, महापूर, घाटनांदुर व वाकडी इत्यादी गावातील शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR