22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeराष्ट्रीयकॅडबरी डेअरी मिल्कमध्ये चक्क जिवंत अळी?

कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये चक्क जिवंत अळी?

 - सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल - कंपनीने दिले उत्तर

हैदराबाद : जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडते असे नाही तर ते मोठ्यांनाही तेवढेच आवडते. आपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो.

मात्र, कॅडबरीच्या क्षेत्रात मोठं नाव असलेल्या डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये अळी सापडल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या अळीचा व्हीडीओ त्या व्यक्तीने सोशल मीडिया एक्सवरती शेअर केला आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

सोशल मीडिया एक्सवर ही पोस्ट रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीने शेअर केली आहे. ही घटना हैदराबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ‘‘अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट नजीक आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का? आरोग्याच्या बाबतीतल्या या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे? असा प्रश्न रॉबिन यांनी उपस्थित केला आहे.

रॉबिन झॅकियस या व्यक्तीने आपल्या पोस्टसोबत एक व्हीडीओही शेअर केला असून त्यात डेअरी मिल्क कॅडबरीचा अर्धवट फाडलेला वरील रॅपर थोडा बाजूला केलेला दिसत आहे. तर कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. या व्हीडीओसोबत खरेदीचं बिलही देण्यात आलं असून त्यात ९ फेब्रुवारी रोजी ही कॅडबरी रत्नदीप रिटेल शॉपमधून ४५ रुपयांना खरेदी केल्याचे दिसत आहे.

कॅडबरी डेअरी मिल्कने दिले उत्तर
रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कने उत्तर दिलं आहे. उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (आधीचं कॅडबरी इंडिया लिमिटेड) कायमच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार [email protected] वर पाठवा. त्यासोबत तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची केलेली माहिती द्या, असे कंपनीकडून संबंधित ग्राहकाला उत्तर देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR