टोरॅँटो : वृत्तसंस्था
जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर लिबरल पक्षाचे नेते चंद्रा आर्य यांनी पंतप्रधानपदासाठी दावा केला आहे. चंद्रा आर्य हे भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षात नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी गुरुवारी ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करून आपली उमेदवारी जाहीर केली. चंद्रा हे आधी जस्टिन ट्रुडोच्या जवळचे मानले जात होते, पण खलिस्तानी दहशतवाद आणि अतिरेक्यावर ट्रुडो यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आर्य त्यांचे कट्टर विरोधक बनले. ६ जानेवारीला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पक्षाच्या नेत्यांच्या दबावामुळे राजीनामा दिला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये ते तिस-यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होता.
चंद्र आर्य हे मूळचे कर्नाटकातील तुमकुरू येथील सिरा तालुक्यातील आहेत. २००६ मध्ये ते कॅनडामध्ये स्थायिक झाले. चंद्रा आर्य यांनी कौसली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, धारवाड येथून एमबीए केले. २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा फेडरल निवडणूक लढवली आणि संसदेत पोहोचले. २०१९ मध्ये ते दुस-यांदा खासदार झाले. आर्य यांनी अनेकदा खलिस्तानी आणि अतिरेकी कारवायांवर टीका केली आहे.
भारतीय वंशाच्या अनिता आनंदही शर्यतीत
जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांच्या नावाचाही पंतप्रधानपदासाठी विचार केला जात आहे. अनिता आनंद या लिबरल पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या आहेत. २०१९ पासून त्या कॅनडाच्या संसदेच्या सदस्या आहेत.