27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याकॅश कांड : हितेंद्र ठाकूरांनाच सर्वात मोठा धक्का

कॅश कांड : हितेंद्र ठाकूरांनाच सर्वात मोठा धक्का

विरार : विशेष प्रतिनिधी
विरारमध्ये कॅश कांड घडले, मात्र बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला. बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत हितेंद्र ठाकूरांनाच मोठा धक्का दिला. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपचे डहाणूचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे सगळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला.

एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचे गु-हाळ सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला होता. विनोद तावडे ज्या विवांता हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे सुमारे चार तास गदारोळ सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले. हा सर्व प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठा डाव साधला. डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांना भाजपने आपल्याकडे वळविले. हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. तथापि, एकंदरीत या घटनेमुळे डहाणू विधानसभेत भाजपची ताकद वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR