मुंबई : प्रतिनिधी
सूर्यकुमार यादवचा षटकार, अश्वनी कुमारचे ४ विकेट्स, रायन रिकल्टनचे अर्धशतक याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मधील पहिला दणदणीत विजय मिळवला. मुंबईने घरच्या मैदानावर केकेआरला पराभवाचा मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा पदार्पणवीर अश्वनी कुमारचे ४ विकेट्स, सर्व गोलंदाजांची योग्य साथ आणि रायन रिकल्टनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने केकेआरला १६.२ षटकांत ११६ धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर ८ विकेट्सने आणि ४३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ च्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण मुंबई इंडियन्सने केकेआरविरूद्ध तिस-या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी दणक्यात पुनरागमन केले. या विजयासह मुंबईचा संघ आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी पोहाचला.
केकेआरने वानखेडेच्या मैदानावर दिलेल्या ११७ धावांच्या छोट्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने सावध सुरूवात केली. रोहित शर्माने एक षटकार खेचला खरा पण तो पुन्हा एकदा फेल ठरला. रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. यानंतर रायन रिकल्टनने संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली. त्याने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली तर विल जॅक्सही १ षटकार लगावत १६ धावा करत बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या वादळी फटकेबाजीचा एक नमुना पाहायला मिळाला. त्याने आज वादळी खेळी केली. ३०० च्या स्ट्राईक रेटने ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. केकेआरकडून आंद्रे रसेलला दोन विकेट घेण्यात यश मिळाले.