केजरीवाल यांच्या विरोधात संदीप दीक्षित मैदानात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून सरकारही स्थापन झाले आहे. महायुतीला मिळालेला एकहाती विजय अवघ्या देशासाठी अचंबित करणारी गोष्ट होती. आता महाराष्ट्रानंतर दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज २१ उमेदवारांची यादीही जाहीर केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित हे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत.
दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, जय किशन आणि हारून युसूफ, अनिल कुमार यांचीही या यादीत नावे आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसने विधानसभेसाठी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या अशा जागा आहेत, जिथे पक्षाला केवळ जिंकण्याची संधी आहे, असा विश्वास वाटत नाही तर या उमेदवारांशिवाय पर्याय नव्हता, अशा जागाही निवडल्या गेल्या, असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.
आम आदमी पक्ष दिल्लीत स्वत:च्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर युती होण्याची कोणतीही शक्यता नाही. दुसरीकडे दिल्लीचे काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी वार्ताहरांना सांगितले की, आम्ही विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार आहोत. आम्ही भ्रष्टाचारी केजरीवाल यांच्या पक्षाशी कोणतीही युती करणार नाही. त्यांच्याशी युती केल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागली आहे.
दिल्ली विधानसभेत इंडिया
आघाडीत आप नाही
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस आणि आपने स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले. हरियाणा निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढत दिली होती.