३ जानेवारीपासून अभियान सुरू होणार : जयराम रमेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवीन वर्षात ३ जानेवारीपासून काँग्रेस नवीन अभियानाला सुरुवात करणार आहे. काँग्रेस ३ जानेवारीपासून जय बापू, जय भीम, जय संविधान हे अभियान सुरु करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने जय बापू, जय भीम, जय संविधान अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे ७ दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आले होते. आता ही मोहीम ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्ष जय बापू, जय भीम, जय संविधान अभियान सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.
बेळगावमध्ये २६ डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही मोहीम यापूर्वी सुरु होणार होती. परंतु गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर हे अभियान पुढे ढकलण्यात आले होते. आता ते ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
संविधान वाचवा राष्ट्रीय
पदयात्रा काढण्यात येणार
प्रचाराचा एक भाग म्हणून मोर्चे आणि निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. २६ जानेवारीला डॉ. आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय २५ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत काँग्रेसच्या वतीने एक वर्षाची संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा काढण्यात येणार आहे.