नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणी दरम्यान, त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना न्यायालयाच्या खोलीतून दुस-या खोलीत नेण्यात आले आणि त्यांना चहा-बिस्किट देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची साखरेची पातळी कमी झाली होती.
दरम्यान, अबकारी धोरण प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. काल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात केजरीवाल यांची चौकशी केली आणि आज सीबीआयने त्यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले. यावेळी सीबीआयने केजरीवाल यांच्या अटकेची मागणी केली असता न्यायालयाने केजरीवालांच्या अटकेला हिरवा कंदीलही दाखवला आणि सीबीआयने न्यायालयातूनच त्यांना अटक केली.