कोल्हापूर : कोल्हापूरची आन-बान-शान असलेली आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रुबाबाचं प्रतीक म्हणून कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपलेला आता ‘क्यू आर’ कोड दिला जाणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर ग्राहकांना चपलेची माहिती समजणार आहे. यामुळे बोगस कोल्हापुरी चपलेच्या विक्रीला आळा बसणार आहे.
एरवी लग्नकार्यात शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई आता कोल्हापुरी चपलेच्या पेहरावात दिसू लागलीय. त्यामुळे दिवसेंदिवस कोल्हापुरी चपलेची मागणी वाढू लागली आहे. पण ग्राहकांना अस्सल आणि टिकाऊ कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या जाणार आहेत.
या तंत्रज्ञानात चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसवली आहे. ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही चप्पल कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली ही माहिती मिळेल. त्यामुळे आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल असली की नकली, हे ओळखता येणार आहे. चपलामध्ये अशाप्रकारे जगात प्रथमच तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
कोल्हापुरी चपलेला लागणारे चामडे कुठून आणले, ते कोणत्या प्राण्याचे आहे, आदी सर्व गोष्टींची माहिती ग्राहकांना मिळते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये वस्तूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यत प्रत्येक गोष्टीची माहिती असते. हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस आणि रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे. यात शेतक-यांचे नाव, पिकाचे नाव, शेतक-यांकडून किती रुपयांना विकत घेतले, ग्राहकांना किती रुपयांना विकणार, याची इत्थंभूत माहिती या चीपमध्ये असते. तसेच या तंत्रज्ञानाचा वापर दूध भेसळीला आळा घालण्यासाठी करण्यात आला.
ग्राहकाचे नाव चीपमध्ये समाविष्ट
विशेष म्हणजे चप्पल विकत घेतल्यानंतर संगणकाच्या आधारे संबंधित ग्राहकाचे नावही त्या चीपमध्ये समाविष्ट केले जात आहे. या माहितीमध्ये कोणालाही फेरबदल करता येत नाही. कोल्हापूरसह सीमाभागात बेळगाव, कर्नाटकातून बोगस कोल्हापुरी चपला विक्रीसाठी येत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोल्हापुरी चपलेला चीप लावण्यात येणार आहे, त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसेल.