कोल्हापूर : देवस्थानच्या ठिकाणी आपण खात असणारा प्रसाद सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचे तुटलेले पान आढळून आले आहे. त्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी मिळत असणारा प्रसाद नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी देखील जोतिबा मंदिर परिसरात तब्बल दोन टन भेसळयुक्त खवा आणि पेढा आढळून आला होता, या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली, पण त्याचे पुढे काय झाले याबाबत मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावरील प्रसादात आढळलेले ब्लेडचे पान हे जोतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादामध्ये आढळले आहे. संबंधित दुकानदारासह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांवर देखील कारवाईची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. प्रसादात ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या मूर्तीची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरू होणार. २१ ते २४ जानेवारी दरम्यान चार दिवस ही संवर्धन प्रकिया चालणार आहे. जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. जोतिबाची मुख्य मूर्ती प्राचीन दगडापासून बनलेली आहे. या मूर्तीवर वर्षानुवर्षे होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज झाली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला संपर्क करून मूर्तीची पाहणी करण्याची विनंती केली होती. या पाहणीनंतर पुरातत्व विभागाने मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया गरजेची असल्याचे नमूद केले होते, त्यानुसार उद्यापासून ही संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे, यादरम्यान भक्तांसाठी जोतिबाची उत्सव मूर्ती मंदिरातील कासव चौकात ठेवली जाणार आहे.