पूर्णा : देशाने नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला परंतु कोल्हेवाडीकरांना अजुनही पक्का रस्ता तर सोडाच पण कच्चा रस्ता सुद्धा मिळालेला नाही. या विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कोल्हेवाडी गावक-यांनी मंगळवार, दि.१० सप्टेंबर रोजी रस्त्यासाठी चिखलात लोळून आंदोलन केले.
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कोल्हावाडी गांवकरी सातत्याने रस्त्यासाठी विविध प्रशासकीय विभागांना निवेदने देत आहेत, प्रत्यक्षपणे बोलत आहेत. परंतु कुठुनच मार्ग निघालेला नाही. सरपंच २ दिवसांत मुरूम टाकू म्हणून मागील महिनाभरापासून चालढकल करीत आहेत. त्यामुळे मंगळवारी डीवायएफआय यांना आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले आहे असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा रस्ता २०१९ ला मातोश्री योजने अंतर्गत मंजूर झाला आहे असे कळाले. रोजगार हमी योजनेमार्फत या रस्त्यावर बिले सुद्धा उचलल्या गेली असल्याचे समजते. परंतु या रस्त्यावर गुडघाभर चिखल असतो. आता पर्यंत ३ नागरिक यामुळे दगावली आहेत.विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून जावे लागत आहे.
वयोवृध्द व आजारी व्यक्तींना या रस्त्याने प्रवास करणे अशक्यच आहे. गावक-यांना आपली वाहने दीड कि.मी. कानडखेड नं. २ या शेजारील गावात लावावी लागतात. या सर्व गोष्टींच्या विरोधात व कोल्हेवाडी येथील पक्का रस्ता व्हावा म्हणून चिखलात लोळून गावक-यांनी आंदोलन केले.
या आंदोलनात डीवायएफआयचे जिल्हा सचिव नसीर शेख, तालुका सहसचिव अजय खंदारे, निरंजन खंदारे, शहराध्यक्ष प्रबुद्ध काळे, शहर सचिव सुबोध खंदारे, शहर उपाध्यक्ष वैभव खंदारे तर गावक-यांमध्ये केरबा पवार, योगेश पवार, सुदाम पवार, वामन पवार, ज्ञानेश्वर पवार, कृष्णा पवार, माउली पवार, तुकाराम पवार, सुरेश कदम आदींचा समावेश होता.
या आंदोलन नंतर डीवायएफायचे पदाधिकारी आणि गांवकरी यांनी तहसीलदारांमार्फत ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन पाठवले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यांनी २-३ दिवसांत रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामविकास मंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात हा रस्ता पक्का बांधून देण्याची आणि सोबतच आजपर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास १५ दिवसांनी परत आंदोलन करण्याचा इशारा डीवायएफआय आणि गावक-यांनी दिला आहे.