नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोळशाच्या विक्रीतून केंद्र सरकारने भरपूर कमाई केली. गेल्या चार महिन्यांत सरकारने कोळसा विक्रीतून २० हजार कोटी रुपयाहून अधिक रुपये सरकारी तिजोरीत आणले आहेत. हा पैसा सरकारी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडने मिळवला आहे. दरम्यान, देशात कोळशाच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली. त्यामुळे विक्रीत देखील वाढ झाली आहे.
कोळशाने गेल्या ४ महिन्यांत (एप्रिल-जुलै) मोदी सरकारच्या खात्यात एकूण २०,०७१.९६ कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडच्या तिजोरीतील योगदान या कालावधीत २.०६ टक्क्यांनी वाढले आहे. कोल इंडिया लिमिटेडने वर्षभरापूर्वी याच कालावधीत सरकारी तिजोरीत १९,६६६.०४ कोटी रुपयांचे योगदान दिले होते. देशातील ८० टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. कोल इंडिया देशातील सर्व पॉवर हाऊसना कोळसा विकते. त्यातून मिळणा-या कमाईचा काही भाग सरकारी खात्यात जमा करते.
जुलैमध्ये कोल इंडियाने सरकारला दिलेली एकूण रक्कम ४,९९२.४८ कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ४७८९.४२ कोटी रुपये होते. रॉयल्टी, जीएसटी, कोळशावरील उपकर आणि इतर शुल्क कोल इंडियाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारांना दिले जातात. कोळसा उत्पादनातून केंद्र आणि राज्य सरकारला भरीव महसूल मिळतो.