क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली

0
92

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांतील दिग्गज नेते आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याने ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.

सचिन तेंडुलकरने या शब्दांत वाहिली श्रद्धांजली
क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करत पवार कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. सचिन तेंडुलकर यांनी अधिकृत एक्स अकाऊंटवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

ओम शांती… : अजिंक्य रहाणे
भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने देखील ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अपघाताची सखोल चौकशी व्हावी : युसूफ पठाण
युसूफ पठाणने श्रद्धांजली वाहताना विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत लिहिले की, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने मी अत्यंत दु:खी आणि व्यथित आहे. ते राज्यासाठी अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणभावनेने काम करणारे एक कर्तव्यदक्ष नेते होते. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील. या गहन दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर, समर्थकांबरोबर आणि संपूर्ण राज्यातील जनतेबरोबर आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. या विमान अपघाताची सखोल आणि योग्य चौकशी झाली पाहिजे.

बातमी ऐकून मोठा धक्का बसला! : मोहम्मद अझरूद्दीन
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करताना लिहिले की, श्री. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वृत्ताने मी अत्यंत हादरून गेलो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मन:पूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि या अपार दु:खाला सामोरे जाण्याची शक्ती व धैर्य त्यांच्या कुटुंबाला देव देवो.
..