परभणी / प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगण उभारणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची जागा देण्याबाबत आ. राजेश विटेकर यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना साकडे घातले. यावेळी कृषीमंत्री कोकाटे यांनी क्रीडांगण उभारणीसाठी कृषी विद्यापीठाची जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्यास मंजुरी मिळाल्यावर जागा हस्तांतरित करण्यात येईल असे कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी आ. विटेकर यांना बोलताना स्पष्ट केले.
आ.विटेकर यांनी दि.२२ जानेवारी रोजी परभणी जिल्हा क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठाची जागा मंजुर करावी अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री कोकाटे यांना दिले होते. या पत्रात जिल्हा क्रीडा संकुल परभणीकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सर्व्हे नं. २०७ व २०८ मधील २५ एकर जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेला होता.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीकडून कार्यकारी परिषदेत जागेचा विषय मान्य करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेने पण मान्यता देवून या जागेच्या मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबीत आहे. तरी ही जागा प्राप्त झाल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडागंण तयार होवून जिल्हयातील खेळाडुंना याचा लाभ होईल अशी विनंती आ.विटेकर यांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे केली होती.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सर्व्हे नं. २०७ व २०८ मधील २५ एकर जागा जिल्हा क्रीडा संकुल समितीस देण्याबाबत शासन निर्णय काढून ही जागा मिळावी असे साकडे आ. विटेकर यांनी घातले होते. यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उत्तर दिले आहे. त्यामुळे लवकरच परभणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारणी होईल अशी आशा निर्माण झाली आहे.