सणासुदीत बजेट कोलमडणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. नुकताच महालक्ष्मीचा सण झाला. आता पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव आणि दिवाळीचा सण येणार आहे. त्यामुळे सध्याचा काळ सणासुदीचा आहे. ऐन सणासुदीत खाद्य तेलाचे दर वाढणार आहेत. केंद्राने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने खाद्य तेलाचे दर पुन्हा गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे बजेट कोलडणार आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता खाद्य तेलाचे दर वाढणार असल्याने सामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे शुल्क वाढल्याने आता सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास सत्ताधारी भाजपने व्यक्त केला आहे.
नवरात्रात ९ दिवसांचे उपवास असतात. या काळात दीपोत्सवही होत असतो. त्यातच दिवाळीत फराळ तयार केला जातो. यासाठी खाद्य तेल वापरले जाते. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडत चालले आहे. केंद्र सरकारने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने याच्या झळा सर्वसामान्यांना बसणार आहेत.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून यासंबंधी अधिसूचना काढली असून, त्यानुसार, क्रूड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढविली आहे. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर शून्य होते. आता हे आयात शुल्क २० टक्के वाढविण्यात आले आहे तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर ३२.५ टक्के करण्यात आले आहेत. त्यामुळे खाद्य तेलाचे दर भडकणार आहेत.
कस्टम ड्युटीत वाढ,
तेलाचे दर वाढणार
कस्टम ड्युटी वाढविल्याने सर्व खाद्य तेलांवरील प्रभावी शुल्क ३५.७५ टक्क्यांवर जाणार आहे. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवरील प्रभावी शुल्क ५.५ टक्क्यांनी वाढला असून, आता तो २७.५ टक्के होणार आहे. रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेलावरचे शुल्क १३.७५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्के होणार आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर भडकणार आहेत.